मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा
मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजनकांचनकरवंदीच्या कांटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जें तुझ्या अंतरीं
निशाणावरी,
नाचतें करीं;
जोडी इहपरलोकांसी
व्यवहारा परमार्थासी
वैभवासि वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
ठायीं ठायीं पांडवलेणीं सह्याद्रीपोटीं
किल्ले सत्तावीस बांधिले सह्याद्रीपाठीं
तोरणगडचा, प्रतापगडचा, पन्हाळगडचाही
लढवय्या झुंझार डोंगरीं तूंच सख्या पाहीं
सिंधुदुर्ग हा, विजयदुर्ग हा, ही अंजनवेल
दर्यावर्दी मर्दुमकीची ग्वाही सांगेल.
ध्येय जे तुझ्या अंतरी..
तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणीकोंडा
वहाण पायीं अंगिं कांबळी उशाखालिं धोंडा
विळा कोयता धरी दिगंबर दख्खनच हात
इकडे कर्नाटक हांसतसे, तिकडे गुजरात
आणि मराठी भाला घेई दख्खन-कंगाल
इकडे इस्तंबूल थरारे, तिकडे बंगाल
ध्येय जे तुझ्या अंतरी..
गीत : गोविंदाग्रज
संगीत : वसंत देसाई
स्वर : जयवंत कुलकर्णी